अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात; एसटी बसला डंपरची धडक, ३ ठार
अक्कलकोट : अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या एसटी
बसचा रुद्देवाडी बस स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. मुरूमाने भरलेल्या डंपरने समोरून
जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाले. अपघातानंतर डंपर पुढे जाऊन उलटला आणि त्यानंतर त्याला आग लागल्याची माहिती
समोर आली आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बस मधील अनेक प्रवासी
जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक
माहितीनुसार, या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर
स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात घेतली असून जखमींना जवळच्या
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप
स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.